महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने केळी पिकासाठी ओळखला जातो. परंतु काही दिवसांपासून केळीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात संगोपनासाठी खर्च करावा लागतो. त्यानंतर पिकाला चांगल्या प्रकारे तयार करता येते. परंतु आज ज्या प्रकारे केळीला ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. त्यात मजुरी वजाकरता शेतकऱ्याच्या हातात ३०० ते ४०० रुपये दरानेच पैसे मिळत असल्याचे निदर्शनात येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्याने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण कसे करायचे, मुला-मुलींचे लग्न कसे करावे, अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण आपल्या स्तरावर योग्य तो तपास करून त्याला त्या संकटातून बाहेर काढावे. तसेच त्यांच्या केळी पिकाला योग्य तो भाव मिळवुन द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात सर्व केळी व्यापाऱ्यांची बैठक घ्यावी, केळी पिकाला हमीभाव जाहीर करावा, सर्व व्यापाऱ्यांची नोंदणी करावी, प्रक्रिया उद्योग व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे, विमा प्रक्रिया सोयीस्कर करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचाही समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात केळी उत्पादकांचे मे आणि जून महिन्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांसोबत इतर पिकांचे नुकसान झाले होते. अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची भरपाई मिळालेली नाही.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगरध्यक्ष विनोद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, उपमहानगराध्यक्ष, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, जळगाव तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, रज्जाक सय्यद, विलास सोनार, तालुका संघटक भूषण ठाकुर, दीपक राठोड, अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
            


