नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवितांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील – डॉ. पंकज मित्तल

0
20

साईमत जळगाव प्रतिनिधी

भारताला विश्वगुरू बनविण्याची क्षमता असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे असून त्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व संस्था, घटक यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ गुरूवार दि.२९ फेब्रुवारीला झाला. या समारंभात असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल दीक्षांत भाषणात बोलत होत्या. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्य.प. सदस्य यांची उपस्थिती होती.
डॉ. मित्तल यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे विविध पैलू उलगडून दाखविले. हे धोरण विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेवर भर देताना उच्च शिक्षणासह व्यावसायिक शिक्षणाच्या एकात्मतेवर लक्ष केंद्रित करणारे आणि कौशल्यावर आधारित शिक्षणाला योग्य प्रतिष्ठा व सन्मान देणारे आहे. हे धोरण प्राचीन भारतीय ज्ञान, शहाणपण आणि सत्याच्या तत्त्वज्ञान विचारांवर विकसित केले आहे. देशाच्या स्थानिक व जागतिक गरजा लक्षात घेऊन मसुदा तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्य आणि घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना विकसित करणारे आहे.
डॉ. मित्तल पुढे म्हणाल्या की, इंटर्नशिप, उद्योगासमवेत संवाद अशा काही महत्वाच्या बाबी या धोरणात आहे. उच्च शिक्षणाच्या संस्था आता मुक्त आणि दुरस्थ शिक्षण तसेच ऑनलाईन शिक्षण कार्यक्रम आयोजित करू शकतील. विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात भरपूर लवचिकता मिळेल. या धोरणातील शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट ही शिफारस क्रांतिकारक असल्याचे डॉ.मित्तल म्हणाल्या. इतर देशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे आणि भारतातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करणे हे धोरणाचे प्राथमिक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणात प्राध्यापकांचे महत्त्व मान्य करण्यात आले आहे असे डॉ. मित्तल म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी सातत्याने विचार करण्याची सवय लावून घ्यावी यातूनच सर्जनशीलता आणि विचार करण्याची प्रक्रिया वाढीला लागते असा सल्ला त्यांनी स्नातकांना दिला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योगशास्त्र विभाग, रूसा समावेशीत केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० विद्यार्थी सहायता दूत, प्रयोगशाळा ते जमीन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनासाठी दिले जाणारे प्रशिक्षण, डिजीटल अॅडजंट फॅकल्टी आणि कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे डॉ. मित्तल यांनी कौतुक केले.
कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करताना गेल्या वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वाटचाल याबद्दल माहिती दिली. यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन सहाय्यक कुलसचिव डॉ. देवेंद्र जगताप अग्रभागी होते. राष्ट्रगीत,राज्यगीत आणि विद्यापीठ गीत यावेळी सादर झाले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. अधिष्ठाता प्राचार्य एस.आर. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्रा. अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ.जगदीश पाटील यांनी मानव विज्ञान विद्याशाखा, आणि डॉ. साहेबराव भुकन यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. कुलपती श्री रमेश बैस यांनी स्नातकांना उपदेश केला.
मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्रा.सतीश कोल्हे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, ॲड.अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.संजय ठाकरे, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
समारंभात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी पालकांसह मंचावर पदक घेण्यासाठी हजर होते. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख व डॉ. विना महाजन यांनी केले.
समारंभासाठी एकुण १९७१६ हजार विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ७९९१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३३३८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ४०४२ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे १२३५ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३९०, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १२८८, प्रताप महाविद्यालयाचे ७१६, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७१२ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली. गुणवत्ता यादीतील ११८ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले.यामध्ये ७७ विद्यार्थिनी व ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे तीन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. या समारंभात २०५ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here