साईमत, यावल : प्रतिनिधी
तालुक्यात डोंगरकठोरा शिवारात सातपुडा जंगलातील धावडा जातीचा ३४ किलो डिंक अवैध वाहतूक करताना आढळून येऊन कारवाईचा देखावा झाला. मात्र, आरोपी फरार झाल्याची घटना शनिवारी, २३ मार्च रोजी यावल पूर्व वन क्षेत्रात घडली. त्यामुळे जळगाव येथे मुख्यालय असलेल्या यावल वन विभाग कार्यक्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डोंगरकठोरा शिवारात ‘जंगल मे मंगल’मधील नाट्य घडले आहे. दरम्यान, वनविभागाच्या कारवाईत वन विभागाने पकडलेल्या ३४ किलो धावडा जातीचा डिंकाची किंमत सात हजार रुपये आहे. तसेच एक दुचाकी मोटर सायकलची किंमत बाजारभावाप्रमाणे १७ हजार रुपये आहे. वन विभागाच्या कारवाईत जप्त वाहनासह मुद्देमालाची किंमत सुमारे २५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर असे की, यावल तालुक्यात डोंगरकठोरा ते डोंगरदे मार्गावरील रस्त्यावर २३ मार्च रोजी सकाळी वन विभाग कर्मचाऱ्यांचे गस्ती पथक गस्त करीत असताना त्यांना एक बिना क्रमांकाची लाल रंगाची बजाज कंपनीची मोटारसायकलवर एक संशयित व्यक्ती धावडा वृक्षाचा डिंक ३४ किलो अवैधरित्या घेऊन जाताना दिसून आला. परंतु वनविभागाचे शासकीय वाहन पाहून तो मोटरसायकल फेकून फरार झाला की, त्याला फरार होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे किंवा कसे? आरोपी का पकडला नाही? याबाबत यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत सहाय्यक वनसंरक्षक हडपे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावर त्यांचा भ्रमणध्वनी ‘नो रिप्लाय’ झाला. त्यामुळे अधिकृत माहिती मिळाली नाही. यावल पूर्व वन विभागात कारवाई झाली. मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांपासून माहिती का लपविली? समजायला मार्ग नाही. तसेच वन विभाग कारवाई करताना सविस्तर माहिती देत नसल्याने सध्या वन विभागाच्या कारवाईबाबत सातपुड्यात आणि चोपडा, यावल, रावेर तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल वन विभाग जळगाव यांच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी चोपडा वन विभाग कोठडीतून आरोपी फरार झाला. त्याचीही माहिती प्रसिद्धी माध्यमांना वनविभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. गेल्या एक-दीड वर्षांपूर्वी यावल पूर्व वन विभागातूनही आरोपी फरार झाले आहे. ते आरोपी अद्याप पकडले न गेल्याने वनविभागाच्या संपूर्ण कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जळगाव येथील यावल वन विभाग उपवनसंरक्षक, सहाय्यक वन संरक्षक आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रपाल यांच्यासह काही वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्या कामकाजाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल पूर्व वन विभागात नुकतेच नवीन वनक्षेत्रपाल बदली होऊन आल्याने कर्तव्य दक्षता म्हणून वन विभागात वनसंपत्तीची तस्करी व लूट करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचा देखावाही दाखविला जात असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात चर्चिले जात आहे. अशा प्रकारे कारवाई सातत्याने सुरू ठेवल्यास तसेच लाकूड व्यवसायिकांची चौकशी केल्यास अनेक गैरकारभार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. याकडे वन विभागाने आपले लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी होत आहे.