साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
लोहारा परिसरात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. धरणावर लोहारा गावाला पाणीपुरवठा केला जातो. मागच्यावर्षी संपूर्ण धरण कोरडे पडून पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. शासनाच्यावतीने वीस ते पंचवीस दिवसांनी पाण्याचे टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मुक्या जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते, हे चित्र लोहारेकरांच्या डोळ्यासमोर असतानाही धरणामध्ये रोज सर्रासपणे अवैध उपसा केला जात आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी शांत आहे. वेळेवर उपाययोजना करा अन्यथा लोहारेकरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यासाठी काही काळ वीज महावितरणने धरण परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवावा. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने धरण परिसरातील मोटारी जप्त करून कारवाई करावी, धरणातील अवैध उपसा वेळीच थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.