शिवसेनेच्या वाघाला, दिलीप वाघांचे चॅलेंज! आमदारांनी पत्रकार परिषदेत अभ्यास करून बोलावे
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी:
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पाचोरा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये ‘कलगीतुरा’ सुरू झाला आहे. विद्यमान आणि माजी आमदार, शिवसेना उबाठाचे घोषित उमेदवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या मेळाव्यात आ. किशोर पाटील यांच्या कार्यशैलीवर टीका व आरोप केले होते. आ.किशोर पाटील यांनीही प्रत्युत्तर देण्यासाठी माजी आमदारांसह उध्दव ठाकरे सेनेच्या संभाव्य उमेदवारांचा खरपुस समाचार घेतांना दिलीप वाघ यांना केलेल्या टीकेत अनेक आव्हाने दिली होती. आमदारांनी दिलेल्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी दिलीप वाघ यांनी शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदारांचे सर्व आव्हाने स्वीकारत त्यांना चॅलेंज स्वीकारण्याचे आव्हान केले आहे. मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत आडनावातच ‘वाघ’ असलेले दिलीप वाघ आणि शिवसेनेचे वाघ आ.किशोर पाटील यांच्यात निवडणुकीत अटीतटीची झुंज बघायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.
पत्रकार परिषदेला संजय वाघ, हर्षल पाटील, श्याम भोसले, खलिल देशमुख, भूषण वाघ, रणजित पाटील, पी. डी.भोसले, अझहर खान, ॲड.अविनाश सुतार, शशी चंदिले, विनोद पाटील, गोपी पाटील, राज जगताप आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत दिलीप वाघ पुढे म्हणाले की, आ.किशोर पाटील यांनी केलेले आरोप, उपकार आणि माझे बाजार समितीत पुनर्वसन ही भाषा तथ्यहिन व जनतेची दिशाभूल करणारी आहे. बाजार समितीवर प्रशासक नेमणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. २०१९ च्या निवडणूक तोंडावर बहुळा धरणाला ‘कृष्णासागर’ हे नाव देउन मराठा समाजाची मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आजही करीत आहे. शासकीय कागदावर बहुळा धरणाला “कृष्णासागर” हे नाव नाही. बहुळा धरणाचे आंदोलन हे स्व. ओंकारआप्पा वाघ यांच्या नेतृत्वात केलेले आंदोलन ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी धरणात गेल्या. त्यांना तत्काळ मोबदला मिळावा, यासाठी होते. आमदारांनी पत्रकार परिषदेत अभ्यास करून बोलावे, असेही दिलीप वाघ म्हणाले.
आमदारांकडे उरले गोडबोले अन् लाभार्थीच
७० वर्षात वाघ परिवाराने जनतेची सेवाच केली आहे. आमचे पुनर्वसन मतदार संघातील जनताच करेल. बहिणींना दिलेल्या साड्या दान दिल्याचे म्हणतात. पोलिसाची नोकरी सोडल्यानंतर १५ वर्षाच्या राजकारणात हे कोट्यावधीचे मालक कसे काय झाले? त्यांनी टाकलेले सर्व व्यवसाय ठप्प झाले. अनेक मित्र सोडून गेले. निष्ठावंत शिवसैनिक सोबत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे मित्र म्हणवतात, मग वर्षभर वैद्यकीय सुविधा घेणाऱ्या जीवलग मित्राला का? वाचवता आले नाही! आमदारांकडे गोडबोले व लाभार्थीच उरले आहेत.
आगामी काळात दोघांमधील ‘कलगीतुरा’ गाजण्याची चिन्हे
मला मतदार संघात शांततेचे वातावरण हवे आहे. आमचे कपडे फाडण्याची भाषा करणाऱ्यांना खुले आव्हान देतो की, मी ‘मराठ्याची’ आणि ‘वाघाची’ औलाद आहे. त्यामुळे माझ्या नांदी लागाल तर दात पडतील. त्यांनी मला पूर्ण ओळखलेले नाही. कुठे, केव्हा यायचं, ते सांगा,असे जाहीर आव्हान देत दिलीप वाघांनी आमदारांसोबत दोन हात करण्याची डरकाळी फोडली आहे. त्यामुळे दोघांमधील ‘कलगीतुरा’ आगामी काळात चांगलाच गाजण्याची चिन्हे आतापासून मतदारसंघात दिसू लागली आहेत.