पत्नीच्या उपचारासाठी गुजरातला गेले, रामनगरमधील घर चोरट्यांच्या हत्यारात
साईमत/एरंडोल (कासोदा)/प्रतिनिधी
कासोदा येथील रामनगर भागात एका निवृत्त सोनाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या चोरीत १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमणलाल नथू सोनार (वय ६९, रा. रामनगर, कासोदा) हे १५ जानेवारी रोजी आपल्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी नवसारी (गुजरात) येथे गेले होते. त्यांचे घर पाच दिवस बंद राहिले. याच काळात अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप फोडून आत प्रवेश केला.
घटनास्थळी केलेल्या पाहणीनुसार, चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १० ग्रॅम सोन्याची मंगलपोत (सुमारे ७० हजार रुपये), देवघरातील १०० ग्रॅम चांदीचे देव (सुमारे २५ हजार रुपये) आणि ७० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
रमणलाल सोनार २१ जानेवारी रोजी दुपारी घरी परतले तेव्हा त्यांनी घराचे कुलूप तुटलेले पाहिले आणि चोरी झाल्याची जाणीव झाली. त्यांनी तत्काळ कासोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. पोलीस हवालदार राकेश खोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अज्ञात चोरट्यांना शोधण्यासाठी स्थानिक सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या मदतीने तपास करत आहेत.पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून घरातील बंदिस्त ठेवल्या जाणाऱ्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याची सूचना केली आहे.
