अतिवेग, ओव्हरलोड आणि टायर फुटल्याने अपघात; केंद्राकडून मदत जाहीर
साईमत / जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात आज (दि. २०) सकाळी भीषण बस अपघात घडला. रामनगरहून कगोतच्या दिशेने जाणारी बस रस्त्यावरून सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळून उलटली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून २९ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि ती अतिवेगात होती. कगोत नाल्याजवळ अचानक बसचे टायर फुटले, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. अपघातात बसचा वरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
जखमी प्रवाशांवर उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही बस सार्वजनिक वाहतुकीची असल्याचे सांगितले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
