साईमत / देवळा
देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजता एसटी महामंडळाच्या शहादा डेपोच्या बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळून झालेल्या या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा डेपोची पुणे-शहादा बस (क्रमांक MH 14 MH 2310) मालेगावच्या दिशेने जात असताना उमराणे शिवारात चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडावर जोरात आदळली. या धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातावेळी बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. अचानक झालेल्या धडकेनंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. यात चालकासह 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही जणांना गंभीर मार लागल्याचेही सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांकडून एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
