साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज गुरूवार दि. २५ जुलै रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत वेबीनारच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधी यांच्याशी शासन निर्णय आणि विविध शिष्यवृत्ती योजना या विषयी संवाद साधणार आहेत तरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांनी या संवादाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी असे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थिंनींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिंनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे विद्यार्थी हिताच्या राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांबाबतची माहिती देण्याकरीता राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधी यांच्यासोबत मंत्री चंद्रकांत पाटील हे वेबीनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण सर्व महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठात केले जाणार आहे. तरी सर्व महाविद्यालयांनी या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था या महाविद्यालयांमध्ये करावी व विद्यार्थी आणि पालक यांना या कार्यक्रमास महाविद्यालयात उपस्थित राहण्याबाबत अवगत करावे. असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी पत्राद्वारे महाविद्यालयांना केले आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहातदेखील कॅम्पसवरील विद्यार्थ्यांसाठी या संवादाचे थेट प्रक्षेपण पहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
