विकासोच्या प्रांगणात साचले ‘पाणीच पाणी’
लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी:
गेल्या काही दिवसांपासून वरुणराजा रुसला होता. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा तडाका सहन करावा लागत होता. आता मात्र दोन दिवसांपासून वरूणराजाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. शनिवारी मात्र दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यातच गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात दमदार पावसामुळे पाणीच पाणी साचले होते. यासोबतच आठवडे बाजारात ‘चिखलाचे स्वरुप’ प्राप्त झाले होते. दुसरीकडे शेत शिवारातील छोटे-मोठे बंधारे ओसंडून वाहत होते. त्यामुळे जमिनीची ओल आणि लोहारा धरणात पाण्याची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. परिसरात शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
ग्राहकांअभावी बाजारपेठेत पसरली शांतता
लोहारा येथे शनिवारी आठवडे बाजार भरत असतो. आठवडे बाजारात परिसरासह खेड्यातील ग्रामस्थ आठवड्याचा बाजार खरेदीसाठी लोहारा येतात. मात्र, दुपारी बारा वाजेपासून पाऊस सुरु होऊन तो सायंकाळपर्यंत सुरुच होता. अशातच पाऊस सुरु असल्याने बाजारपेठेत ग्राहकांअभावी शांतता पसरली होती. तसेच गावातील व्यापाऱ्यांचीही तीच स्थिती होती.