दोंडाईचा परिसरात पावसाची दडी;

0
25

साईमत, दोंडाईचा : प्रतिनिधी
परिसरात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीतील पिके करपू लागली आहेत. दरम्यान, मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जोरदार पावसाअभावी ५ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
शिंदखेडा तालुक्यात यंदा सुरवातीपासूनच जेमतेम पाऊस होत आहे. भिजपावसावरच शेतकऱ्यांनी कपाशीलागवड व पेरण्या करून टाकल्या. निम्मा पावसाळा संपला, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला, मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतातून पाणी वाहून निघालेच नाही. नदी, नाले, ओढे वाहिले नाहीत. जलयुक्त शिवाराचे बंधारे, साठवण बंधारे, धरणे कोरडी ठणठणीत पडली आहेत.

बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरी उपशावर आल्या. मेमध्ये कपाशी लागवड केल्याने पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पिकांची वाढ खुंटली, परिणामी उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी बागायतदार शेतकऱ्यांची कांदालागवड रखडली आहे. सरासरीपेक्षा ही कमी पाऊस झाला आहे. सुमारे दोनशे मिलिमीटरही पाऊस यंदा झाला नसल्याचे आकडेवारीवरून समजते.

वातावरणातील गारवा, आणि रिमझिम पाऊस यामुळेच पिके तग धरून आहेत. येत्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला नाही तर दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र निर्माण होऊ शकते. आगामी दिवसांत पाऊस होईल की नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे. आवश्‍यक त्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून पेरणी, लागवड केली. आंतरमशागतीची कामे उघडिपीच्या काळात शेतकऱ्यांनी उरकून घेतली. रोज आकाशाकडे टक लावून बघणारा शेतकरी मात्र हातबल झालेला दिसून येत आहे. जो दिवस येतो तो तसाच जातो, असे शेतकरी सांगतात. येत्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला नाही तर दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहाव्ो, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here