साईमत / जळगांव
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच उन्हाने आक्रमक रूप धारण केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर वर्दळ कमी होत असून अनेक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी ४३.७ अंश तापमानाची नोंद झाली होती. मात्र यंदा ११ एप्रिललाच पाऱ्याने ४० अंश ओलांडल्याने उष्णतेची तीव्रता लवकर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे मुख्य बाजारपेठा आणि महामार्गांवरील वर्दळ दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत उकाड्याचा कळस गाठला जात असून संध्याकाळी ७ वाजल्यानंतरही उष्णतेची झळ कायम राहत आहे. नागरिक उन्हापासून बचावासाठी टोपी, रुमाल आणि स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत.
आता पुढे काय?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच येत्या सहा दिवसांत तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून ‘उष्णतेची लाट’ कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
