साईमत न्यूज नेटवर्क –
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर आणि भूस्खलनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारीपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांना बसला असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सततच्या पावसामुळे दरहाली नदीसह खंडली सूक्तोह आणि जमोल नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरहाली नदीची पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या सखल भागांत पाणी शिरले. राजौरीतील बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये पाणी घुसल्याने तेथे उभ्या असलेल्या अनेक गाड्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्या. याशिवाय अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले असून नागरिकांचे आर्थिक नुकसानही प्रचंड झाले आहे.
बचाव पथकांच्या माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट तहसीलमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. खराब हवामान, सततचा पाऊस आणि रस्त्यांचे नुकसान यामुळे मदत व बचाव कार्यात अडथळे निर्माण होत असले, तरी प्रशासन आणि बचाव पथके बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राजौरीमध्ये भूस्खलनाच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पूरग्रस्त भागांतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू असून, अब्दुल्ला ब्रिज परिसराखालून सुमारे 50 कुटुंबांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. तसेच तारिक ब्रिज परिसरातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठीही बचाव मोहीम सुरू आहे.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक एसओएस कॉलला तातडीने प्रतिसाद दिला जात असून नागरिकांचे प्राण वाचविणे हे सध्या प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पाणी ओसरल्यानंतरच मालमत्तेच्या नुकसानीचा नेमका अंदाज घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून माता वैष्णो देवी आणि बाबा अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. श्रीनगर, राजौरी, पुंछसह अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
