साईमत जळगाव प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथे झालेल्या पाणी आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही आपली भूमिका स्पष्ट केली.
पाणी परिस्थितीबाबत बोलताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील जलसाठा आणि पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला असून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील काळात पाण्याचे योग्य नियोजन आणि बचत अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, महिला विधेयकाबाबत बोलताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचे जोरदार समर्थन केले. “महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम आहेत. आज त्या सर्व क्षेत्रांमध्ये उच्च स्थानावर पोहोचल्या आहेत,” असे सांगत त्यांनी महिला आरक्षण आणि सहभागाचे स्वागत केले.
भविष्यात राजकारणात महिलांचा मोठा सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करताना मंत्री पाटील म्हणाले की, राष्ट्रपती पदापासून ते विविध महत्त्वाच्या पदांवर महिलांनी यशस्वी कामगिरी केली आहे. “आमदार-खासदार होणे ही महिलांसाठी देशाच्या विकासात योगदान देण्याची सुवर्णसंधी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
मतदारसंघ फेररचनेबाबत बोलताना त्यांनी सावध भूमिका घेत सांगितले की, “मतदारसंघ बदलतील की राखीव होतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र प्रत्येकाने आपली तयारी ठेवावी, जसे पैलवान आपला आखाडा तयार ठेवतो.”
राजकीय मुद्द्यांवर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा यांच्याबाबत थेट प्रतिक्रिया देणे टाळले. “त्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यावर भाष्य करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
नाशिक येथील TCS प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री पाटील यांनी एटीएस आणि एएनआय चौकशीचे समर्थन केले. “चौकशी झाली पाहिजे, दोषींना सोडू नये, पण कायद्याच्या चौकटीतच कारवाई व्हावी,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवू नये, असेही त्यांनी नमूद केले.
केळी पीक विमा घोटाळ्याबाबत बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांची आणि दलालांची जबाबदारी असल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई होईल, पण कोणत्याही शेतकऱ्याला थेट गुन्हेगार ठरवणे योग्य नाही,” असे त्यांनी सांगितले.
राजकीय संबंध आणि भेटीगाठींबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी “राजकारण वेगळं आहे, वैयक्तिक संबंध वेगळे असतात” असे सांगत सर्वांशी संवाद ठेवण्याची संस्कृती महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. “विचारांची लढाई करा, वैयक्तिक नाही,” असा सल्लाही त्यांनी दिला.
रोहित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबत विचारले असता, “शेवटी रक्ताचे नाते आहे,” अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकूणच, जळगावातील पाणी आढावा बैठकीनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनिक मुद्द्यांपासून ते राज्यातील राजकारणापर्यंत अनेक विषयांवर स्पष्ट आणि थेट भूमिका मांडली.
