पोलीस रायझिंग डे अर्थात पोलीस वर्धापन दिन
साईमत /मलकापूर/प्रतिनिधी :
पोलीस रायझिंग डे अर्थात पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्ताने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ६ जानेवारी २०२६ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांनी देवधाबा येथील मोतीलाल संचेती विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच विविध प्रकारच्या शासकीय हत्यारांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वास निर्माण व्हावा व कायद्याची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याचप्रसंगी ‘पोलीस काका -पोलीस दीदी’ या जनजागृती उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. गुड टच–बॅड टच, तक्रार पेटीत गोपनीय तक्रार कशी टाकावी, पोक्सो कायद्याची माहिती, दामिनी पथकाचे कार्य तसेच डायल ११२ या आपत्कालीन सेवेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास तात्काळ पोलीस काका किंवा पोलीस दीदी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या कार्यक्रमास सुमारे ३० ते ४० विद्यार्थिनींसह शिक्षकवर्ग तसेच मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे महिला व पुरुष अंमलदार उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदा, सुरक्षा आणि पोलीस प्रशासनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
