स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला
साईमत /तळोदा /प्रतिनिधी
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ.आर.डी.मोरे होते. यावेळी प्रा.एल एन.पाटील, प्रा.के.एम.शिंदे, मनिष कलाल, पवन शेलकर,जितेंद्र चौधरी,योगेश महाजन,महेंद्र सामुद्रे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी मागील वर्षी विद्यापीठाद्वारे “सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी” या पुरस्काराने सन्मानित झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पारबती अजित पावरा यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा आणि स्त्री शिक्षणातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा प्रेरणादायी आढावा घेतला. शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन शक्य असल्याचा संदेश त्यांनी यावेळी अधोरेखित केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. स्वप्निल वाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत दलाल, शिवदास प्रधान, विष्णू पाडवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण, समानता व सामाजिक न्यायाच्या मूल्यांची जोपासना करावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
