वाहतूक नियम पाळा – सुरक्षित जीवन जगा’ या संदेशासह रॅली शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवरून काढण्यात आली.
साईमत/मलकापूर /प्रतिनिधी –:
रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मलकापूर शहरात वाहतूक पोलिसांच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मलकापूर शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.
‘वाहतूक नियम पाळा – सुरक्षित जीवन जगा’ या संदेशासह रॅली शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवरून काढण्यात आली. रॅलीदरम्यान दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्याचे, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याचे, मद्यपान करून वाहन न चालवण्याचे, वेगमर्यादा पाळण्याचे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचे संदेश फलकांवरून नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले.
या उपक्रमात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यांनी स्वतः हेल्मेट परिधान करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. रॅलीदरम्यान अनेक नागरिकांनी थांबून हा उपक्रम पाहिला आणि पोलीसांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा ही फक्त पोलीस प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त रुजण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
