योग्यता असलेला उमेदवार विरोधी पक्षात आहे का? जामनेरातील मतदारांमधून उमटला सूर
सुरेश उज्जैनवाल
जामनेर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मंत्री गिरीष महाजन यांना आव्हादन देण्यासाठी भाजपाचेच पदाधिकारी जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांचे पक्षांतर घडवून रा.काँ.पक्षात (शरद पवार गट) प्रवेश देत त्यांच्याच हातात ‘तुतारी’ देत आठवड्यापूर्वी जामनेरमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत त्यांची उमेदवारीही घोषित केली. या घडामोडींचा नेमका काय परिणाम होईल किंवा झाला. तत्पूर्वी या मतदार संघाची मानसिकता आणि मतदारांवर प्रभाव कुणाचा जाती-पातीचा, पक्षाचा की व्यक्तीचा? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता लक्षात आल की, जळगाव जिल्ह्यातील हा एकमेव असा मतदारसंघ आहे की, ज्याच्यावर जाती-पातीचा कोणताही परिणाम होत नाही किंबहुना समाज, जातीपेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवून निर्णय देणारा चोखंदळ मतदारसंघ आहे. त्यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल सलग सहावेळा मंत्री गिरीष महाजन यांना पराभूत करणे विरोधी पक्षांना शक्य झालेले नाही. एवढं जबरदस्त गारुड महाजन यांनी मतदारांच्या मनावर निर्माण केलेले आहे.
जामनेर विधानसभा मतदार संघातील गेल्या तीस वर्षांच्या लढतीचा विचार केला तर विधानसभेच्या गेल्या सहा पंचवार्षिक निवडणुकीतील स्थिती लक्षात घेता गिरीष महाजन यांना माजी खासदार तथा रा.काँ.चे नेते ईश्वरलाल जैन दोनवेळा अनुक्रमे १९९५ आणि १९९९ मध्ये आव्हान दिले होते तर संजय गरुड २००४, २००९मध्ये महाजन यांच्याविरोधात लढले तर २०१४ मध्ये डी.के.पाटील यांचे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांच्या वाट्याला अपयश आले. गेल्या सहा पंचवार्षिक निवडणुकीत चार पंचवार्षिक निवडणुकीत मराठा कार्ड वापरला तरी ही महाजनांचा पराभव होवू शकला नाही. प्रत्येक निवडणुकीत दहा हजारांपेक्षा तर कुठे २० हजारांचे मताधिक्य घेत महाजन यांनी यश खेचून आणले. सहा निवडणुकींचा निकाल पाहता महाजन अजिंक्य ठरतात, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. जामनेर मतदार संघातील मतदारांची मानसिकता पाहता महाजनांविषयी जिव्हाळा दिसून येतो. जामनेरमधील काही नागरिकांशी महाजनविषयी विचारणा केली तर ते म्हणतात, महाजन नेता म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून वावरतात. स्वत:ची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना जेवढे भाजपमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे बळ मिळते, तेवढे अन्य ठिकाणी अनुभवास येत नाही. त्यांच्या प्रभावाचे उदाहरण द्यायचे झाल्यास जामनेर नगरपरिषदेचे देता येईल. जामनेर नगरपरिषदेतील नगरसेवकांची एकूण जागा २४ होत्या. भाजपने पूर्णच्या पूर्ण २४ जागा जिंकल्या होत्या. हाही एक इतिहास ठरला होता.
१०५ पैकी ८५ ग्रामपंचायतीवर प्रभुत्व
जामनेर मतदारसंघात एकूण १०५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ८५ ग्रामपंचायतीवर भाजप अर्थात महाजन प्रणित गटाची सत्ता आहे. बाजार समित्या असो की, विविध कार्यकारी संस्था यावरही महाजनांचाच वरचष्मा आहे. त्यांच्या या प्रभावाला आव्हान देवू शकेल असे व्यक्तीमत्त्व आहे का? मतदार संघातील विकास कामांचा विषय महत्त्वाचा मुद्दा आहे. मंत्री महाजन यांनी गेल्या दीड वर्षात जामनेर शहरासह ग्रामीण भागात केलेली विकासाची कामे नजरेस भरणारी आहे. सिंचन प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्राला खूप मोठी मदत झाली. जामनेर तालुक्यात सध्याच्या घडीला यावल, रावेर पेक्षाही जास्त केळीचे उत्पादन होत आहे. रस्त्यांच्या विकासामुळे अर्थकारणाला चालना मिळाली. ज्या धडाडीने महाजन यांनी मतदारसंघाचा कायापालट केला तसा करण्याची योग्यता असलेला विरोधी पक्षात आहे का? या अंगानेही मतदार विचार करतात, हे विशेष होय.
गिरीष महाजन एक व्यक्ती नसून ती सर्व जातीधर्माची शक्ती आहे. ते कामाशी बांधीलकी जोपासणारे आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची नाळ जनतेच्या प्रत्येक घटकाशी जोडलेली आहे. त्यामुळे कोणताही पक्ष किंवा नेता आला तरी फरक पडणार नाही.
-राजू जाधव, उपसरपंच, पहुर कसबे
गिरीष महाजनांचे मतदारांशी घट्ट नाते असून जातपात हा विषय महाजन बाबतीत नाही. मराठा हा विषय तर अजिबात नाही. राजकारणात कशाला हवी जात भाजपमध्ये जात, पात नाही उलट भाजपच आमची जात आहे. शिवाय महाजनांनी आमच्या भागात विकासाचा जो डांेगर उभा केला आहे. तीच त्यांच्या यशाची पावती आहे.
-तुकाराम विठोबा निकम, सरपंच देवपिंप्री, ता.जामनेर
दिलीप खोडपे भाजपमध्ये होते. म्हणून त्यांना जि.प.अध्यक्षाच्या माध्यमातून ‘लालदिवा’ मिळाला. भाजप सोडण्याची जी कारणे ते सांगत आहेत, ती पटणारी नाही. गिरीष महाजन ही व्यक्ती जात नसलेला व्यक्ती आहे. आज रोजी माझ्या पहुर गावात ५१ कोटींची कामे सुरु आहेत. विकासाची गंगा त्यांनी आमच्या तालुक्यात आणली. त्यामुळे कुणीही आला अन् गेला तरी फरक पडत नाही. गिरीष महाजन यांना जातीच्या माध्यमातून नव्हे तर सार्वजनिक विकासाच्या माध्यमातून आव्हान देवून जनतेला सामोरे जा.
– राजधर पांढरे, माजी जि.प.सदस्य