फैजपुरला ठेवीदारांनी केले लाक्षणिक उपोषण
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन जनतेच्या हितासाठी प्रचंड प्रमाणात कल्याणकारी योजनांची घोषणा करीत आहे. बहुतांश त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व ठेवीदारांना एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या मागणीसाठी खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे फैजपूर प्रांत कार्यालयासमोर गुरुवारी, १० रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पतसंस्थांचे यावल, रावेर तालुक्यातील ठेवीदार उपस्थित होते.
ठेवीदारांना एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज कोणत्याही अटीशिवाय देण्यात यावे, ठेवीदारांच्या फसवणूक करून प्रचंड मालमत्ता जमा केलेल्या पतसंस्था चालकांविरुद्ध १९९९ च्या कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याच्या मागणीसाठी तसेच कलम ८८ अन्वये निश्चित जबाबदारीच्या रकमा वसूल करण्यासंदर्भातील मागणीसाठी व त्याचबरोबर वसुली होत असताना ठेवीदारांना ठेवीच्या रकमा परत न करता मोठ्या प्रमाणावर कर्ज मॅचिंगच्या व्यवहारांची चौकशी एसआयटी मार्फत करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी नायब तहसीलदार गुरव यांनी निवेदन स्वीकारून सोमवारी, १४ ऑक्टोंबर रोजी ठेवीदारांचे शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविले असल्याचे खान्देश ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी कळविले आहे.