जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरी कुमावतचा गौरव

0
3

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची तायक्वांदो खेळाडू तथा इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गौरी कुमावत हिने राष्ट्रीय पातळीवर तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदविल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमात पहूरच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत आणि आर.टी. लेले हायस्कुलचे क्रीडा शिक्षक अनिल पाटील यांनाही मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन रवींद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जामनेर पंचायत समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात मंगळवारी, १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, लॉर्ड गणेशा स्कुलचे प्राचार्य धनंजय सिंग, ज्ञानगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे, बोहरा सेंट्रल स्कुलच्या प्राचार्या श्रीदेवी नायर, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.हरीश शेळके, कार्याध्यक्ष सचिन महाजन, जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here