संयुक्त कारवाईत पथकाने एकाला घेतले ताब्यात
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हा येथील एकाला स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलीस पथक यांच्या संयुक्त कारवाईत बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १७ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास केली असल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील रहिवासी नसीर शहा रऊफ शहा हा इसम गांज्याची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीला देण्यात आली. त्या अनुषंगाने एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून कारवाई केली. त्यात पोलिसांसह पंच तसेच अन्य आवश्यक घटकांचा समावेश होता. पथकाने नसीर शहा रऊफ शहा याच्यावर कुऱ्हा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील जागेत छापा टाकून त्याला अटक केली. त्यात नसिर शहा याच्याकडे १३.५१ किलो वजनाचा व दोन लाख ७१ हजार ४०० रूपयांचा गांजा जप्त केला आहे. पथकाने नसीर शहा याला ताब्यात घेतले आहे.
एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
एलसीबीचे कर्मचारी संघपाल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड, मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकाने केली.