साडेसात लाख पात्र शिधापत्रिकाधारकांचा गणेशोत्सव अन्‌‍ दिवाळी होणार गोड!

0
3

साईमत, नाशिक : प्रतिनिधी
पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र गरजू लाभार्थ्यांचा गौरी-गणपती उत्सव तसेच दिवाळी सण गोड होणार असून, जिल्ह्यातील तब्बल सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होईल.गौरी-गणपती उत्सवानिमित्त 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा संच वितरित होणार आहे.
पात्र शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधाजिन्नसांचा समाव्ोश असलेला एक शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच 100 रुपये या दराने वितरित करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबाला (बीपीएल, पिवळे, प्राधान्य केशरी शिधापत्रिका) याचा लाभ होईल. राज्यातील एक कोटी 65 लाख 60 हजार शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह 493 कोटी रुपये शासन खर्च करणार असून, प्रतिसंच 239 रुपये या दराने हा शिधा संच खरेदी होईल.जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या एक लाख 75 हजार 215 शिधापत्रिका, तर प्राधान्य कुटुंबाच्या सहा लाख 38 हजार 434 शिधापत्रिका लाभार्थ्यांना आठ लाख 13 हजार संचाची मागणी करण्यात आली होती. अन्न व नागरी पुरवठा विभागाने सात लाख 78 हजार 203 शिधा संच मंजूर केले आहेत. सणासुदीत सर्वसामान्यांना अत्यावश्‍यक असणाऱ्या वस्तू आनंदाच्या शिद्यात मिळत असल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. दरम्यान, तालुक्यांच्या साठवण गोदामापर्यंत पुरवठा विभागातून हे संच पाठविले जात आहे. या संचातील शिधा जिन्नस खराब तसेच खाण्यास योग्य होण्याची मुदत चार महिन्याची असल्याची खात्री पुरवठा विभागाला करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here