आ.अग्रवाल यांच्या सहा महिन्यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृहांच्या दुरुस्तीसह नवीन इमारतींसाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १७ कोटी ७५ लाख ३८ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, या निधीमुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींच्या दोन्ही कामांचा मार्ग मोकळा झालाआहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.अग्रवाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.
शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ७५० विद्यार्थी तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होऊन दाखल होतात. त्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था असावी, यासाठी शहराचे आ.अनुप अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वसतिगृहाचे बांधकाम व जुन्या वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव देण्याची सूचना केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला दिला होता. त्यांनी गेल्या १३ जानेवारीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना तसे पत्र देत दोन्ही कामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती.
पत्रानुसार त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगह इमारतीची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ३७ लाख व विद्यार्थिनींच्या वसतिगृह इमारतीची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ३५ लाख, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी ११ कोटी २ लाख ६४ हजार अशा १७ कोटी ७५ लाख ३८ हजारांच्या निधीस गेल्या १७ जून रोजी प्रशासकीय मान्यता दिली. या कामांच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. राज्य शासनाच्या येत्या पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पात अर्थसंकल्पित होऊन निविदा प्रक्रिया होईल.
अधिष्ठाता, विद्यार्थ्यांनी मानले आभार
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सोयीसाठी आ.अनुप अग्रवाल यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत वसतिगृहांसाठी १७ कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणला. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. ही दोन्ही कामे मार्गी लावल्याबद्दल भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसह विद्यार्थ्यांनी आ.अग्रवाल यांचे आभार मानले.
हॉस्पिटल, होस्टेलसह नेत्र रुग्णालयासाठी पाठपुरावा
लवकरच हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी होस्टेलसह १०० खाटांचे सुसज्ज नेत्र रुग्णालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसा प्रस्ताव शासनाला दिला आहे. तो मंजुरीसाठी पालकमंत्री रावल यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्यालाही मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.