जामनेर पालिकेतर्फे ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना तीन लाख ९१ हजाराचा निधी

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील नगर पालिकेच्या २०२३-२०२४ ह्या आर्थिक वर्षातील नगर पालिकेच्या महसुलातील उत्पन्नाचा पाच टक्के निधी तीन लाख ९१ हजाराचा निधीचा धनादेश ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना माजी नगराध्यक्षा साधना महाजन, पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी नगरसेवक खलील अहमद यांच्या हस्ते सोमवारी, ११ मार्च रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

जामनेर नगरपरिषद हद्दीतील ३८९ दिव्यांगांनी २०२३/२४ या आर्थिक वर्षात नोंदणी केलेली होती. त्यापैकी २७५ दिव्यांगांना यापूर्वी दहा लाख दोन हजार रुपयांचा निधी वाटप केला होता. उर्वरित ११४ दिव्यांगांना निधीचा धनादेश सोमवारी प्रदान करण्यात आला. यावेळी साधना महाजन, जितेंद्र पाटील यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. तसेच दिव्यांग शासकीय योजनेबाबत विश्‍वशांती दिव्यांग संस्थेचे पवन माळी यांनी दिव्यांगांना शासकीय योजनेविषयी मार्गदर्शन केले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, उपमुख्याधिकारी रविकांत डांगे यांनीही दिव्यांगांना मार्गदर्शन केले.

राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचेल, याविषयी सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त दिव्यांगांना पाच टक्के निधी आणि प्रत्येक दिव्यांगांना निधी देणारी एकमेव नगर परिषद म्हणजे जामनेर नगरपरिषद आहे.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांसोबत कर निरीक्षक देविदास अहिरे, आत्माराम शिवदे, दिव्यांग बांधव हेमंत भालेराव यांच्यासह इतर नगरपरिषदेचे कर्मचारी, शहरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विश्‍वशांती दिव्यांग संस्थेचे पवन माळी, रवी झाल्टे, महेंद्र माळी, अंबिकाबाई टाकळी, श्रावण धमाले, किशोर माळी यांच्यासह जामनेर शहरातील दिव्यांगांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here