पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांडून स्ट्रॉंग रूम, मतमोजणी ठिकाणांची पाहणी

0
1

साईमत जळगाव प्रतिनीधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एमआयडीसी भागातील वखार महामंडळाच्या गोदामात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची तसेच दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी होणार असलेल्या केंद्राची नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवार दि. ४ एप्रिल रोजी पाहणी करत सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शक विविध सूचना केल्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतूर्लिकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात दि. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दिनांक चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे (EVM) मशीन ठेवण्याकरिता जळगाव एमआयडीसीतील कुसुंबा परिसरात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गोदाम क्रमांक १४ व जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गोदाम क्रमांक १५ येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. तरी याच परिसरातील गोदाम क्रमांक १६ येथे जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी व गोदाम क्रमांक १७ येथे रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. त्यादृष्टीने स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांची पाहणी बुधवारी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केली. व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here