रामदेववाडीला वादळामुळे घर कोसळून आदिवासी एकाच कुटुंबातील चार जण ठार, चिमुकला बचावला

0
52

साईमत, यावल : प्रतिनिधी

सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबापाणी गावाजवळील रामदेववाडी येथे वादळात रविवारी, २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास एक आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून चार जण जागीच ठार झाले. मयतात पती-पत्नी, मुलगा, मुलगीचा समावेश आहे. घटनास्थळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ रात्रीच भेट दिली. यानंतर चारही मयताचे शव शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वादळी पावसात रात्री झालेल्या दुर्घटनेत मात्र त्या परिवारातील आठ वर्षाचा बालक सुदैवाने बचावला आहे.

सातपुड्याच्या किनारपट्टीसह तसेच रावेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी, २६ मे रोजी सायंकाळी जोरदार वादळी वारा पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केल्याने अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी छत कोसळून अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. यावल तालुक्याला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. त्यात अनेक गावातील शेती शिवारांमध्ये असलेले पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

पावरा कुटुंबावर मोठा नैसर्गिक आघात

तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी बहुल आदिवासी वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर मोठा नैसर्गिक आघात झाला आहे. वादळ वाऱ्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना श्‍वास घेता न आल्यामुळे नानसिंग गुला पावरा (वय २८), त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा (वय २२) तसेच रतीलाल हा ३ वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही २ वर्षांची मुलगी गुदमरून जागीच मरण पावली. ढिगाऱ्याखालून याच कुटुंबातील शांतीलाल नानसिंग पावरा (वय ८) हा सुदैवाने घराबाहेर पडल्याने त्याचे प्राण बचावले. त्याने बचावासाठी आरडाओरड करून परिसरातील लोकांना बोलावून दुर्घटनेची माहिती दिली.

थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह थोरपाणी पाड्यावर धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह ढिगाऱ्याखालून काढून शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here