नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला दिलासा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील २४ गावातील शेतकऱ्यांना सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि नाले, ओढ्याच्या पुराचे पाणी शेत शिवारात प्रवाहित झाल्याने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान जळगाव, धरणगाव तालुक्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तालुक्यातील वडली, म्हसावद येथे काही दुकानांसह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासही हिरावून नेला आहे. प्रत्यक्ष शेतात येऊन श्री.देवकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून पाहणी केली.
त्यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्ता भारणे यांच्याशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थिती मांडली. कृषीमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नुकसान भरपाईसंदर्भात न्याय मिळेल, असे ठाम त्यांना आश्वासन दिले. यानंतर श्री.देवकर यांनी जळगावच्या तहसीलदारांशीही संपर्क साधून शेतपाहणीसाठी विनंती केली. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे थोड्याच वेळात त्या प्रत्यक्ष शेतपाहणीसाठी आल्या. तलाठी, कृषी सहाय्यक यांना तात्काळ आदेश दिले. तेही सोबत होते. दरम्यान, तहसीलदार राजपूत, मंडळ अधिकारी येवले, तलाठी आदींनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले.शेत शिवाराला तलाठी, कृषी विभागाची यंत्रणा भेटी देत असल्याचे चित्र होते.