एक लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लांबविला
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
गावालगतच्या शेत शिवारातील पत्र्याची शेडचे कुलूप तोडून चार ठिकाणी डल्ला मारून लोखंडी साहित्यासह एक लाख ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घोसला शेत शिवारात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी पाच वाजता अज्ञात तीन ते चार चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
घोसला गावालगत बनोटी रस्त्यावर अनिल भिका बोरसे गट क्र.६८, सुभाष हरणे गट क्र.२२४, ज्ञानेश्वर गवळी गट क्र. २२१ यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडचे एकाच रात्री कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ३१ हजार रुपयांचे शेती उपयुक्त साहित्य चोरी करून पोबारा केला आहे. दरम्यान रविवारी सकाळी सात वाजता शेतकरी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उपनिरीक्षक रजाक शेख यांनी घटनास्थळी धाव घेवून दुपारी दोन वाजता पंचनामा केला आहे.
अनिल भिका बोरसे यांच्या शेडमधून दहा क्विंटल लोखंड, खताच्या पिशव्या, ठिबकचे बंडल, दोन वीज पंप आणि फवारणी पंप असा ९१ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल सुभाष हरणे यांच्या शेतातील २५ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल ज्ञानेश्वर गवळी यांच्या शेतातून पीटर मशीन वीज पंप यासह १४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल असा तिन्ही ठिकाणावरून एक लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले आहे.
याप्रकरणी शेतकरी अनिल भिका बोरसे यांच्यासह तिघांनी दिलेल्या संयुक्त फिर्यादीवरून अज्ञात तीन ते चार चोरट्यांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रजाक शेख, जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, संदीप सुसर, अजय कोळी आदी तपास करत आहे.
गावात पसरले भीतीचे वातावरण
गेल्या महिन्यात घोसला गावात माजी सभापती चंद्रकांत पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य घरी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४५ हजार रुपये रोख आणि सोन्याची दागिने चोरून लंपास केले होते. सततच्या चोरीच्या घटनेमुळे घोसलावासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा तपास मात्र शुन्य आहे. त्यामुळे सोयगाव हद्दीत चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे सोयगाव पोलिसांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.