केळीसाठी जिल्हाधिकारी प्रसाद अभ्यासूरित्या अँक्शन मोडवर सुचवले दीर्घकालीन पर्याय : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

0
226

साईमत / न्यूज नेटवर्क / रावेर

केळीचे भाव निश्चित करतांना जळगाव व बऱ्हाणपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांनी समन्वय साधावा,व्यापाऱ्यांकडून बँक हमी घेऊन परवना द्यावा व केळी उत्पादकांना ठगवणाऱ्या बोगस व्यापाऱ्यांवर समित्यांनी कठोर कारवाई करावी अशाउपाययोजना अंमलात येतील यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अभ्यासूरित्या अँक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने आयोजित आजचे चर्चासत्र केळी उत्पादकांना काही अंशी दिलासा देणारे ठरले.

रावेर येथे माजी सैनिक हॉल मध्ये केळीला स्थिरभाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्राला
फैजपूर विभागाच्या सहायक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णासिंह, जिल्हा कृषी अधिक्षक कुर्बान तडवी, बऱ्हाणपूर बाजार समितीचे सचिव महेंद्रसिंह,रावेर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील,उपसभापती योगेश पाटील,एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी,माजी जि.प.सदस्य नंदकीशोर महाजन,भाजप जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांचा प्रमुख सहभाग होता.
प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी केळीबाबत शेतकरी व व्यापारी यांचेकडून निर्माण होणाऱ्या समस्या व नियमित उद्भवणारे प्रश्न समजून घेतले.चर्चासत्रात नंदकिशोर महाजन यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनावर भर द्यावा,सुरेश शिंदे यांनी केळीचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा,अरविंद गांधी यांनी एक बीलं पद्धत लागू करावी,छोटू पाटील यांनी व्यापाऱ्यांनी तीन टक्के कट्टी लावल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी,सुरेश धनके यांनी लिलाव पद्धत सुरू व्हावी,राजीव पाटील यांनी ८० टक्के व्यापारी बोगस असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा,विशाल अग्रवाल यांनी व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय नसणे यासह पाणंद रस्त्यांच्या अडचणी मांडल्या.माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी,कृऊबा संचालक प्रल्हाद पाटील,पितांबर पाटील, योगिराज पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, प्रणित महाजन,सुरेश पाटील, यांचेसह शेतकरी व्यापारी यांनी सुद्धा अनुषंगिक प्रश्न उपस्थित केले.त्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संगोपांग चर्चा करून अगदी मुद्देसूद व अभ्यासूरित्या उपाययोजना सुचवल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवल्या उपाययोजना :

>> बऱ्हाणपूर,रावेर,यावल,चोपडा बाजार समिती यांनी एकत्रित व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केळी भाव निश्चित करावेत.
>> केळीची चक्राकार पद्धतीने लागवड व्हावी.
>> हापुस आंबा,केसर आणि सफरचंद खरेदीप्रमाणे केळी खरेदी करण्यासंबंधी अभ्यास करून त्याच धर्तीवर केळी विक्री धोरण तयार करावे.
>> केळी पीक सिंगल प्रॉडक्ट न ठेवता विशेषतः मल्टी प्रॉडक्ट करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा.
>> जिल्ह्यातील व बऱ्हाणपूर बाजार समित्यांनी मिळून केळी भाव एक राहिल यासाठी समन्वय ठेवावा.
>> सर्व व्यापाऱ्यांचे रजिस्ट्रेशन असावेत त्यासाठी बँक गॅरंटी लागू करावी.
>> बोगस व्यापारी शोधून समित्यांनी अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
>> तीन किलो कट्टीचा निर्णय समन्वयाने सोडवावा.
>> व्यापारी व शेतकरी यांच्यातील स्पर्धेचे वातावरण नष्ट करावे.केळीचे भाव वाढण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन बाजार समितीत्यांनी नियोजन करावे.

यांची होती उपस्थिती :

रावेर बाजार समितीच्या वतीने केळी उत्पादकांना दिलासा देणाऱ्या या चर्चासत्राला कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके,निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, व्यापारी संजय अग्रवाल,नितीन पाटील,संतोष पाटील,रमेश वैदकर,विनोद पाटील,बाजार समिती संचालक डॉ.राजेंद्र पाटील,राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, जयेश कुयटे,मंदार पाटील,सैय्यद असगर आदींची उपस्थिती होती.

लिलावासाठी नव्याने समिती :

केळी लिलाव प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चासत्रात ठोस निर्णय न झाल्याने बाजार समितीकडून केळी भाव काढण्यासाठी नव्याने समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.यात सभापती, सचिव,तीन व्यापारी,दोन संचालक यांच्या समावेश असलेली समिती गठीत करणार आहे.तर नोंदणीकृत व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी माल द्यावा असे आवाहन सभापती सचिन पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here