साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
जेडीसीसी बँकेच्या जळगाव नवीपेठेतील ‘दगडी बँके’च्या इमारत विक्रीच्या प्रस्तावापाठोपाठ आता जळगाव मधीलच आणखी एका जुन्या वास्तूच्या विक्रीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग या संस्थेची इमारत विक्री करण्यासाठी संस्थेचे सर्वेसर्वा संजय पवार यांनी प्रयत्न चालवले आहे.
दगडी बँक इमारत विक्री प्रस्ताव प्रकरण प्रचंड गाजत असताना आजच सहकारी कॉटन मार्केटिंगच्या इमारत विक्री करण्याचा विषय उजेडात आला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी १९४८ मध्ये स्थापन झालेली ही संस्था आहे. या संस्थेच्या उभारणीत अथवा या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कै.रामरावजी जीभाऊ पाटील होते. त्यांच्यानंतर कै.दामूभाऊ पांडू पाटील यांनी संस्थेची धुरा सांभाळली. संस्थेला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी कै. उदयसिंग अण्णा पवार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जळगावमधील सहकारी कॉटन मार्केटिंगची इमारत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानली गेलेली संस्था आहे. संस्थेची इमारत आर.आर.विद्यालय परिसरात असून ती विक्री करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही इमारत शहराच्या अगदीच मध्यवर्ती आणि उद्योग, व्यापारी क्षेत्राच्या परिसरात असून तिची किंमतही कोट्यावधी रुपयांमध्ये असणारच. दरम्यान, या संस्थेच्या इमारत विक्रीला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोध दर्शविला आहे.
… अन् विक्री प्रस्ताव वांध्यात
सहकारी कॉटन मार्केटिंगच्या इमारतीची परवानगी मिळावी, म्हणून सहकार विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष निबंधकाकडे अर्ज करण्यात आला. पण सध्या तरी जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिलेली नाही. किंबहुना कदाचित ती नाकारली जाण्याची शक्यता अधिक असल्याचे सहकारी विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.