साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
गेल्या २६ मे रोजी झालेल्या वादळामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. नवीन विद्युत पोल, पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा, कृषी पंपाचे विद्युत कनेक्श्न यासह अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी आ.राजेश एकडे यांनी ६ जून रोजी वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.तायडे यांच्यासोबत चर्चा करुन ही समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.
झाडे उन्मळून विद्युत तारांवर पडल्याने १ हजार विद्युत पोल क्षतीग्रस्त झाले होते. तसेच अनेक विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जनावरांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने पाण्याअभावी जनावरे मृत पावले होते. अनेक गावे अंधारात बुडालेली होती. अजुनही बहुतांश ठिकाणी बऱ्याच अडचणी आहेत. काही गावांमध्ये विजेचे खांब उन्मळून पडल्याने त्याठिकाणी नवीन पोलची आश्यकता आहे. काही ठिकाणी ट्रान्सफार्मर नाहीत, नवीन विजेच्या तारा ओढणे अशा अडचणी दूर करण्यात येवून शेतीतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा सूचना आ.एकडे यांनी दिल्या. बैठकीला महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.