शहरात १२५ डेसीबलच्यावर आवाज असलेल्या फटाक्यांना बंदी

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्यशासनाच्या निर्देशानुसार शहरातील वायु प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून दिवाळीच्या पार्श्वभूमिवर शहरात १२५ डेसीबलच्यावर आवाज असलेल्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी १२५ डेसीबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके विक्री करतांना किंवा फोडतांना आढळून आले तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, शहरात रात्री ७ ते १० वाजेपर्यंत कमी आवाजातील फटाके येतील परंतु मोठ्या आवाजाचे फटाके फोडतांना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल. तसेच बांधकामाचे काम करतांना मालमत्ताधारकाने त्या बांधकाम क्षेत्राला आजूबाजूने पत्रा किंवा ग्रिन नेटच्या सहाय्याने झाकणे गरजेचे आहे. त्यामुळे उडणारी धुळ हवेत मिसळू नये, याची दक्षता मालमत्ताधारकाने घ्यावी, तसेच वेस्ट मटेरीअलची वाहतूक करतांना देखील ते झाकणे आवश्यक असून उघड्यावर टायर, कचरा, प्लास्टीक जाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कोणी असे कचरा, टायर, प्लास्टिक जाळतांना आढळून आल्यास त्यांना १० हजार रुपये दंड आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे स्मशानभूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करतांना गोवऱ्या, गॅस दाहिनी किंवा इलेक्ट्रिक दाहिनीचा वापर करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मनपा आयुक्तांकडे झाली बैठक

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका, वाहतूक शाखा व उप प्रादेशिक परिवहन विभागाची बैठक बुधवारी महानगरपालिका आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांच्याकडे झाली. बैठकीत आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी एसटी महामंडळ, मनपासह वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाला सूचना करण्यात आल्या. यावेळी प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले, वाहन निरीक्षक श्रध्दा महाजन,प्र. सह आयुक्त उदय पाटील, अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी, प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, लक्ष्मण सपकाळे, इंद्रजीत पाटील पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here