साईमत, सावदा, ता. रावेर : वार्ताहर
आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून फरार झालेला संशयित आरोपी तथा शाळा समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दुसरीकडे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनाही तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.
सविस्तर असे की, सावदा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचा शाळेच्या चेअरमननेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शालेय समितीचे चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान या प्रमुख संशयितासह मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांच्या विरोधात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे सर्व जण पोलिसांच्या हातावर तुरी देत होते.
दरम्यान, अक्रम खान अमानुल्ला खान याला अटक करण्यात येत नसल्याने पालकवर्ग मोठ्या प्रमाणात संतप्त झाला होता. त्यातून काही दिवसांपूर्वी पालकांनी पोलीस स्थानकावर धडक देऊन संशयितांना अटकेची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सावदा पोलिसांनी शालेय समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला आज बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना भुसावळ येथील सत्र न्यायालयात सादर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.