यावलला महास्वच्छता अभियानाचा झाला ‘फियास्को’

0
1

साईमत, यावल : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जळगावहून भुसावळमार्गे किंवा किनगावमार्गे आले तरी दोन्ही बाजूने यावल शहरात प्रवेश करताना बोरावल दरवाजापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील यावल-भुसावळ रस्त्याच्या वळणावर आणि महाराणा प्रतापनगरमधून नगरपालिकेत नदीपात्रातील रस्त्यावरून येताना नगरपालिका कार्यालयापासून १०० ते २०० मीटर अंतरावर हरिता-सरिता नदी पात्रात महास्वच्छता अभियानाचा ‘फियास्को’ यावल नगरपालिकेने कसा केला आणि नगरपालिकेच्या ‘दिव्याखाली अंधार’ कसा आहे हे प्रत्यक्ष दिसून आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शहराची पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभागातर्फे १२ जानेवारी २०२४ पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यावर शासनाने जनजागृतीसाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च जाहिरातीच्या माध्यमातून केला आहे. सर्वेक्षण २०२३ अभियानात राज्यातील अनेक शहरांना पुरस्कार प्राप्त झाले. स्वच्छ शहर विकासाकडे अग्रेसर ध्येय आणि उद्दिष्ट असताना मात्र यावल शहरात महास्वच्छता अभियानाचा ‘फियास्को’ झाल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी यावल नगरपालिकेकडून महास्वच्छता अभियान आठवडे बाजारात राबविण्यात आले. हे अभियान यावल नगरपालिकेच्या विश्‍वासातील खास कर्मचाऱ्यांनी राबवून संबंधित यंत्रणेची दिशाभूल करून प्रसिद्धीही मिळवून घेतली.

प्रसिद्धी करताना मात्र शहरात खरोखरच सर्व प्रभागातील सर्व ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविले गेले का? त्याची चौकशी किंवा खात्री न करता प्रसिद्धी करण्यात आली. त्यांना यावल नगरपालिकेजवळील महाराणा प्रताप नगरकडे जातांना रस्त्यात नदीपात्रात प्रचंड असलेली घाण नदीपात्राचे झालेले प्रदूषण दिसून आले नाही का? तसेच बोरावल दरवाज्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील यावल-भुसावळ वळणावर कशी दयनीय अवस्था झाली आहे. यावल नगरपालिकेला व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसून येत नाही का? महास्वच्छता अभियानात यावल शहरातील अनेक मोकळ्या जागांवरील घाण, केरकचरा आजही ‘जैसे थे’ आहे.

बस स्टॅन्डजवळील पायविहीर कचऱ्याने भरण्याच्या मार्गावर

यावल बस स्टॅन्डजवळील ऐतिहासिक पायविहीर कचऱ्याने फुल भरण्याच्या मार्गावर आहे. यावल पंचायत समितीच्या मागील बाजूस मोकळ्या पटांगणावर कशी दयनीय अवस्था झाली आहे आदी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यास यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात महास्वच्छता अभियानाचा ‘फियास्को’ कसा झाला आहे हे प्रत्यक्ष दिसून आल्याशिवाय राहणार नाही, असे संपूर्ण यावल शहरात चर्चिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here