शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
गलवाडा-वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या शिवसेनेचे फिरोज पठाण यांची सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड केली आहे. सरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवारी गलवाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर होते. दरम्यान, सरपंच पदासाठी फिरोज पठाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज मिळाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर यांनी दुपारी दोन वाजता केली. सरपंचपदी फिरोज पठाण यांची बिनविरोध निवड होताच शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला.
यावेळी विशेष सभेसाठी सभागृहात नऊ पैकी सहा सदस्य उपस्थित होते. उर्वरित तीन सदस्य अनुपस्थित होते. यावेळी सुशीला इंगळे, आसमा पठाण, मंगला बिऱ्हारे, मधुकर इंगळे, फिरोज पठाण, दीपाली औरंगे असे सहा सदस्य उपस्थित होते. सहायक म्हणून तलाठी विष्णू पवार, ग्रामसेवक सैवर यांनी कामकाज पाहिले.