साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीत अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाने ४९ कोटी ५९ लक्ष ६४ हजारांचा निधी सोयगाव तालुक्याला दिला असून याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.
तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने ३६ हजार ४६८ हेक्टर वरील पिके बाधित झाली होती या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले होते त्यानुसार नुकसान झालेल्या ३२ हजार ९८० शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ४९ कोटी ५९ लक्ष ६४ हजारांचा निधी तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे त्यामुळे दहा दिवसात ३२ हजार ९८० बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वाढीव दराने तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हा निधी वर्ग करण्यात येणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदतीपोटी जिल्ह्यासाठी चार दिवसांपूर्वी २६८ कोटी १२ लक्ष ७२ हजार इतका निधी जिल्ह्यात प्राप्त झाला होता या निधीची रक्कम तालुका निहाय अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे तहा तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली आहे.