शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज

0
10

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत. गुलाबी बोंडअळीकरीता शेतकऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. त्यामुळे उत्पादन तर कमी मिळेल. शिवाय कापसाची गुणवत्ता चांगली मिळणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संचालक डॉ.भागीरथ चौधरी यांनी केले. दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र, जोधपूर आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील पळासखेडे (मिराचे) येथील दिनेश पाटील ह्यांच्या कापूस शेतात आयोजित ‌‘कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी जागरूकता आणि व्यवस्थापन‌’ याविषयावरील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कापूस लावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने कापूस पिकाचे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता कापूस पिकात गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनात पिकामध्ये निरीक्षण करून गुलाबाच्या कळीप्रमाणे असणाऱ्या डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात. एकरी ५ कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी. अंडी नाशक किटकनाशकाची फवारणी करावी, असे विचार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा कृषिविद्या, विस्तार आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. बी. डी. जडे यांनी मांडले.

एस.ए.बी.सी.चे शास्त्रज्ञ डॉ.दीपक जाखड यांनी कापूस पिकामध्ये पी.बी. नॉटचा वापर व कामगंध सापळे कसे लावावेत, त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. जैन इरिगेशन कंपनीचे सामाजिक कार्य खुप कौतुकास्पद आहे. ठिबक सिंचनाचा व्यवसाय करणारी ही कंपनी कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीच्या समस्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांंना मदत करीत असल्याचे बघून तसेच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम जैन इरिगेशन करीत असल्याचे प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा कृषी विभाग आत्माचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवादे यांनी मनोगतात व्यक्त केले. तसेच त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचीही माहिती शेतकऱ्यांना दिली. हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुप उपयुक्त ठरणार आहे. याकरीता जैन इरिगेशन आणि दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान संस्थेचे आभार मानतांना दिनेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला सत्कार

उपक्रमात समाविष्ठ शेतकरी दिनेश पाटील, भगवान राजपूत, संजय पाटील, देवानंद पाटील, जगन गायके, प्रभाकर पाटील, बळीराम माळी, गोपाळ राजपूत, दिवाकर पाटील, नाना शिंदे, प्रमोद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, मनोज पाटील, तुषार पाटील, जैन ठिबक वितरक अजय पाटील, सुशांत चतुर (नेरी), पी. के. पाटील (जळके) तसेच परिसरातील कापूस शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here