मेळाव्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख करणार मार्गदर्शन
साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।
पाचोरा- भडगाव बाजार समितीच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख हे खरीप पिक काढणीची वेळ आलेली असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन, मका, कापूस पीक घरात येण्यासाठी हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला आ.किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, बाजार समितीच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पत्रकांचे वाचन करून मंजुरी देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांचा विचार करणे कामकाज होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटी सदस्य, व्यापारी, हमाल मापाडी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती पी.ए. पाटील, सचिव बी.बी. बोरुडे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.