साईमत, नंदुरबार । प्रतिनिधी
येथे व परिसरात रिमझिम पाऊस वगळता अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यातच रिमझिम सरींवर उगवून आलेल्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतशिवारात कीटकनाशक फवारणीची लगबग दिसून येत आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आलेला आहे. मात्र, कळंबूसह परिसरात जोरदार पाऊस पडलेला नाही. रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मका, मूग, तूर, बाजरीच्या पेरणीची कामे आटोपली असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
रिमझिम पावसाच्या सरींवर पिके तगलेली आहेत. त्यातच पिकांमध्ये गवत, तण वाढत असल्याने खुरपणी, मशागतीची कामे करावी लागत आहेत.रोजंदारीचे दरही वाढलेले आहेत. जेमतेम पावसाने पिकांची वाढही खुंटत आहे. बदलत्या वातावरणामुळे कोवळ्या पिकांवर मावा, तुडतुडे तसेच विविध रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीची कामे करावी लागत आहेत.त्यासाठी आर्थिक भुर्दंड बसत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पावसाचे उर्वरित दोन महिने जोरदार पाऊस पडण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे विहिरी नदी, नाले वाहून निघतील व येणारा रब्बी हंगाम सुखकारक होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.