फैजपूर l प्रतिनिधी
शेतात निंदनीचे काम करीत असताना अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने आमोदे गावावर शोककळा पसरली. ही घटना दिनांक ३ ऑगस्ट २२ रोजी दुपारी दीड वाजता घडली.
आमोदे तालुका यावल येथील शेतकरी ज्ञानदेव धनु चौधरी (वय -५५ ) हे आपल्या वडिलांसमवेत शेतामध्ये ज्वारी निंदणीचे काम करीत होते. त्यांच्या मदतीसाठी त्यांची फैजपूर येथील बहिण मालती तोताराम चौधरी या सुद्धा त्यांना मदत म्हणून निंदणी साठी शेतात आल्या होत्या. दिनांक ३ ऑगस्ट २२ रोजी दुपारी दीड वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यावेळी शेतातील काम सोडून बांध्यावर ज्ञानदेव चौधरी हे आंब्याच्या झाडाखाली तर त्यांचे वडील गवताने भरलेल्या बैलगाडी खाली जाऊन बसले. आणि जवळच केळीच्या बागेत त्यांची बहीण मालती चौधरी जाऊन उभ्या राहिल्या.
अचानक मोठ्याने विजेचा आवाज होऊन ज्ञानदेव चौधरी यांच्या अंगावर वीज पडली आणि ते तेथेच मृत्यू मुखी पडले. ते दृश्य बघून वडील आणि बहीण आक्रोश करायला लागले. गावात ही वार्ता समजली आणि भर पावसात गावातील नागरिक शेतात जमा झाले. चार वर्षांपूर्वी ज्ञानदेव चौधरी यांच्या पत्नीचे निधन झाले होते.घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलगा नोकरीच्या शोधासाठी आठ दिवसापूर्वीच पुण्याला गेला तर मुलगी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. आईच्या व आता वडिलांच्या अशा निधनाने दोघेही मुलं निराधार झाले आहे. या गरीब व निराधार मुलांसाठी शासनाने त्यांना भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनी सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मकसुद शेख, हेड कॉन्स्टेबल उमेश सानप, गोकुळ तायडे, विकास सोनवणे यांनी पंचनामा करून मयताचे शव यावल येथे ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविले. आज शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची खबर प्रमोद भागवत वाघुळदे या शेतकऱ्याने फैजपूर पोलिसात दिल्याने गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पो. हवालदार गोकुळ तायडे करीत आहे.