साईमत : धुळे : प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत केंद्र व राज्य शासनातर्फे देशभर शाश्वत स्वच्छतेसाठी गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल केली जात आहेत.जी गावे मॉडेल झाली आहेत अशा गावांमध्ये १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत दृश्यमान स्वच्छतेसाठी कुटुंबभेटी अभियान राबविण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत हागणदारीमुक्त अधिक जिल्ह्यासाठी व शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्ह्यातील हागणदारी मुक्त अधिक (मॉडेल) झालेल्या गावांमधून हे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशावर्कर, जलसुरक्षक, ग्रामरोजगार सेवक, सीआरसी यांच्यामार्फत भेटी देण्यात येत आहेत.गृहभेटीदरम्यान कुटुंबांना विचारण्याची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.
यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, पाणी स्वच्छता समिती आदी विषयांबाबत ५० प्रश्न विचारले आहेत.याची पडताळणी कुटुंबभेटी अभियानातून करावयाची आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी केले आहे.