साईमत/ न्यूज नेटवर्क । धानोरा, ता. चोपडा ।
देवगाव, बिडगाव, मोहरद, वरगव्हाण, कुंड्यापाणी, पुनगाव, पिंप्री, मितावली, पारगाव, पंचक आदी परिसरात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे जेमतेम पडणाऱ्या पावसावर शेतकरी वर्गाने उडीद, मूग, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे लागले असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. परिसरात शेतकऱ्यांनी महागड्या किंमतीचे बि- बियाणे घेऊन पेरण्या केल्या. मात्र, अजुनही जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
बोंडअळीच्या ॲटकमुळे शेतकरी धास्तावले
गेल्यावर्षी कापूस पिकावर भाव कमीने अचानक ॲटक केल्याने कापसाचे जेमतेम उत्पन्न हाती आल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे परिसरात कापूस लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
केळी बागांना फटका
कांदे बाग केळीला तीव्र उन्हाचा फटका बसला आहे. त्यात पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने बागांना पुरेसे प्रमाणात पाणी न मिळाल्याने केळी बागाच्या उत्पन्नावर मोठी घट होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीत भर पडणार आहे. त्यामुळे कोणत्या पिकांची लागवड करावी, काय करावे या विंवचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे.
बोंडअळीचे अनुदान रक्कम मिळण्यास दिरंगाई
बऱ्याच दिवसांपासून बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम जाहीर झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ती शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. त्यामुळे ती संबंधित महसूल विभागाने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावी. शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी रास्त मागणी व्यक्त होत आहे.
जून अखेरीस पारा ४०च्यावर
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने खरीपासह रब्बी पिकांच्या उत्पन्नात घट झालेली आहे. पावसाळा कमी झाल्यामुळेच यावर्षी उन्हाळा जास्त राहील, अशी चर्चा सद्यस्थितीला परिसरात होत आहे.
शेती मशागतीच्या कामांना वेग
येत्या काही दिवसातच पाऊस सुरू होईल. त्यासाठी शेतीमशागतीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. मजुर वर्ग दररोज सकाळी लवकर उठुन शेती बांधावर हजेरी लावत आहेत तर शेती कामाला मजुर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.
बैलजोडी दुर्मीळ
शेतीच्या कामासाठी बैलजोडीची गरज असते. मात्र, तंत्रज्ञानाच्या युगात नवे बदल झालेले आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याचा मित्र मानल्या जाणाऱ्या सर्जाराजाची अर्थात बैलजोडी दुर्मीळ झाल्याची स्थिती बहुतांश ठिकाणी दिसत आहे. पेरणीपूर्व शेती मशागतीची सर्वच कामे ट्रॅक्ट्ररच्या साह्याने होतांना दिसत आहे. त्यामुळे बैलजोडी जणू काही अदृश्यच झाली असल्याचे जाणवते.
यंदा पावसाळा जोरात होण्याची अपेक्षा
काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा सरासरीपेक्षा जास्त होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळेे शेतकरी मोठ्याप्रमाणात पावसाळा होईल या आशेने आकाशाकडे टक लाऊन बसला आहे. गेल्या तीन ते चार वर्षात कमी झालेल्या पावसाळ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. यावर्षी तरी पावसाळा चांगला होईल, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.