लिक पाईपलाईनमुळे दररोज लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी

0
46

साईमत, यावल : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपूर्वी येथील नगरपरिषदेने ३ कोटी १७ लाख ६२ हजार ३१५ रुपये खर्च करून विकसित कॉलनी भागात नवीन पाईपलाईन टाकली आहे. ठेकेदाराने नवीन पाईपलाईनचे काम ९० टक्के चुकीच्या पद्धतीने आणि अटी शर्ती खड्ड्यात घालून केल्याने पाईपलाईनचे ठिकठिकाणी बारा वाजले आहेत. आता फैजपूर रस्त्यावर हॉटेल पूर्णब्रह्माजवळ पाईपलाईन लिक झालेली असल्यामुळे दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून जात असल्याने पाण्याची नासाडी होत आहे. याकडे यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख दुर्लक्ष करून पाईपलाईन दुरुस्त करत नसल्याने पर्यायी नागरिकांना अत्यल्प पाणीपुरवठा आणि तो सुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान,सहाय्यक आयुक्त अन्‌ मुख्याधिकाऱ्यांच्या वेतनातून वसुलीची कार्यवाही करणार? असा चर्चेचा सूर उमटू लागला आहे.

सविस्तर असे की, यावल येथील फैजपूर रस्त्यावरील हॉटेल पूर्णब्रह्माजवळ पाण्याची पाईपलाईन लीक झालेली आहे. याठिकाणी यावल नगरपरिषदेने टाकलेल्या पाईपलाईनवर आता एका खासगी जागा प्लॉट मालकाने कंपाऊंड केलेले असल्याने पाईपलाईन नेमकी कुठे लिक झालेली आहे, हे समजून येत नाही. त्यामुळे यावल नगरपरिषद पाईपलाईन लिकेजचे काम तात्काळ करत नसल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

पाणी पुरवठा, पाणीपट्टीच्या माध्यमातून मात्र यावल नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याठिकाणी पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी यावल नगरपरिषदेला काय अडचण येत आहे? किंवा यावल नगरपरिषद पाईपलाईन लिकेज दुरुस्ती का करत नाही? आणि यावल नगरपालिका पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यासाठी आणि त्याठिकाणी शासकीय कामात जो अडथळा येत आहे. त्यासाठी असमर्थ ठरत असल्याने तसेच पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करत नसल्याने वाया जाणारे पाणी आणि त्यावर होणारा खर्च म्हणजे वाया जाणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी यावल नगरपरिषद विद्यमान मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेतील सहाय्यक आयुक्त यांच्या पगारातून वसुली करण्याची मागणी आणि याबाबतची लेखी तक्रार करून भारतीय जनसंसदचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील पाठपुरावा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here