मधुकर कारखान्याची शोकांतिका… भाग ३
कारखान्याचे न्हावी शाखेतील बचत खात अद्यापही गोठविलेलेच
सुरेश उज्जैनवाल
यावल तालुक्यातील न्हावी येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करुनही कारखान्याकडे असलेली विविध घटकांची देणी अद्यापही बाकी आहेत. मे. इंडिया बायो ॲण्ड ॲग्रो पॅसिफिक प्रा.लि.कंपनीने मधुकरची मालमत्ता विकत घेत मालमत्तेचा ताबा घेवून १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला. पण संबंधित खरेदीदार कंपनीने विक्री बाँड अंतर्गंत कामगारांसह इतरांच्या देणीविषयी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कारखाना विक्री करुनही प्रश्न सुटलेला नाही. कामगारांनी थकीत वेतनासाठी राज्याचे सहसंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेवून ‘आमचा प्रश्न सोडविला नाही तर आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन करु’, असा लेखी स्वरुपात इशाराही दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार साखर आयुक्त, पुणे यांनी केलेल्या आरआरसी कारवाईनुसार १५८१.१३ लाख रुपये एवढी रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांची उस बिलापोटी थकीत होती. सदर रकमेपैकी आतापर्यंत १४९६.०९ लाख एवढी रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली गेली आहे. तर ८५.०४ लाख एवढी रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांचे मागणी दावे जसजसे प्राप्त होतील त्याप्रमाणे वाटप करण्याचे नियोजन होते. मात्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी रक्कम भरणा न केल्याने भविष्य निर्वाह निधी आयुक्त नाशिक यांनी न्हावी शाखेतील कारखान्याचे बचत खाते गोठविलेले आहे. बचत खाते गोठविल्यामुळे शेतकऱ्यांचे उस पेमेंट अदा करण्याविषयी अडचणी येत आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संपूर्ण थकीत कर्ज व्याजासह निरंक झाल्यामुळे कारखाना व्यवस्थापनातर्फे जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेली उर्वरित २६.२३ हेक्टर जमीन आणि त्यावरील प्रशासकीय इमारत, कामगार वसाहत, ईटीपी व पडीत शेतजमीन हक्कसोड पत्र करुन कारखान्याच्या ताब्यात देण्याबाबत जिल्हा बँकेसोबत पत्रव्यवहार झालेला आहे. परंतु तत्पूर्वी बँकेने जंगम मालमत्ता म्हणजे विक्री व्यवहारामध्ये उल्लेख नसलेली सर्व वाहने, मूळ कागदपत्रके आदींचा तसेच खरेदीदार कंपनीस करुन दिलेल्या सेल सर्टीफिकेट मध्ये उल्लेख नसलेली स्थावर मालमत्ते व्यतिरिक्तची सर्व जंगम मालमत्तेचा आधी ताबा देण्यात यावा. त्यानंतर मालमत्तेचा हक्क सोडपत्र तयार करुन ताबा देण्यात येईल, असे जिल्हा बँकेस कळविण्यात आलेले आहे. पण त्यासंदर्भात बँकेने कोणतीही तत्परता अद्याप दाखविलेली नाही.