आंदोलनकर्ते अभ्यासकांच्या नियोजन बैठकीत माजी खा.उन्मेश पाटील यांची भीमगर्जना
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
गिरणा खोरे अधिक समृद्ध करणारा नार-पार गिरणा खोरे प्रकल्पाबाबत राज्यपालांच्या स्वाक्षरीचे पत्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून बळीराजाची शुद्ध फसवणूक आहे. राज्य सरकारकडे पैसा नसल्याने हा प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही, हे माहीत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेली भूमिका ही बळीराजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हेतू आहे. केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प मंजूर झाला तरच तो साकारला जाऊ शकतो. महाराष्ट्र सरकार हे गुजरात धार्जिणे झाल्याने प्रकल्पाबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. नारपार गिरणा खोरे योजना पूर्तीसाठी प्रकल्पाबाबत सखोल माहिती असणाऱ्या अभ्यासकांची नियोजित बैठक झाली आहे. यात राज्य सरकारच्या विरोधात भुमिका घ्यावी, असा एकमुखी ठराव करण्यात आला आहे. याकरीता शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी गावागावातून बळीराजा ट्रॅक्टर भरून प्रांत कार्यालयावर धडक देतील. शेतकऱ्यांचा एल्गार नार-पार पूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही, अशी भीमगर्जना माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे. नार-पार गिरणा खोरे योजनेच्या आंदोलनकर्ते अभ्यासकांच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता नार-पार प्रकल्प रद्द केल्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात नार-पार गिरणा खोरे प्रकल्पाच्या अभ्यासक, आंदोलनकर्ते, संघटना, पर्यावरण प्रेमी, जलप्रेमी, संस्था समिती, सर्व पक्षीय संघटनांची पुढील आंदोलनासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्यभरातून अभ्यासक उपस्थित होते.
सुरुवातीला पांजण डावा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र सोनवणे यांनी आंदोलकांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकातून ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ तथा पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ॲड.विश्वासराव भोसले यांनी नार-पार गिरणा खोरे प्रकल्प बळीराजांच्या आयुष्यात क्रांती करणारा असल्याचे सांगत प्रकल्पाबाबत सखोल माहिती उपस्थितांना दिली. सुरुवातीला शंभर कोटी रुपयांचा हा प्रकल्प सात हजार कोटींवर गेला आहे. शेतकऱ्यांबाबत शासनाचे उदासीन धोरण कायमस्वरूपी संपवायचे असेल तर गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
यांनीही मांडली भूमिका
यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, वांजूळ पाणी संघर्ष समितीचे प्राध्यापक के.एन.अहिरे, निखील पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, ज्येष्ठ नेते सतीश दराडे, खान्देश हितसंग्राम संघटनेचे कैलास पाटील वाघडूकर, खान्देश जलपरिषदेचे दीपक पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे, खान्देश हितसंग्राम सुरेश पाटील, जि.प.सदस्य शशी साळुंखे, राष्ट्रवादी एसपी पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, गिरणा खोरे बचाव समितीचे विवेक रणदिवे यांनी आपली भूमिका मांडली.
राज्यभर आंदोलनाचा मनोदय
नार-पार गिरणा खोरे बचावासाठी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी प्रत्येक गावातून शेकडो शेतकरी ट्रॅक्टर भरून आणण्याचा संकल्प करुन प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन राज्यभर आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.