साईमत न्यूज नेटवर्क –
घाटंजी तालुक्यातील शिरोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून कुलरमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे अवघ्या १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वराज सुरज उले असे मृत बालकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळच्या वेळेत घडली. स्वराजची आई अंगणात साफसफाईचे काम करत होती, तर घरातील इतर सदस्य झोपेत होते. याचदरम्यान स्वराज अंगणात खेळत असताना घरात सुरू असलेल्या कुलरजवळ गेला. कुलरमध्ये पाणी भरलेले असल्याने खेळता खेळता त्याने हात पाण्याच्या टाकीत टाकला.
मात्र, कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने स्वराजला जोरदार विजेचा धक्का बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरात एकच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी तत्काळ कुलरचा वीजपुरवठा बंद करून स्वराजला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे उले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिरोली गावात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनीही या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः लहान मुले घरात असताना कुलर, पंखे, वॉशिंग मशीन यांसारख्या उपकरणांची नियमित तपासणी करणे, वायरिंग सुरक्षित ठेवणे आणि उपकरणांमध्ये अर्थिंग योग्य प्रकारे असणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
