बाजार समितीच्या सभागृहात होईल निवडीची सभा
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
येथील जळगाव बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदाच्या निवडीची सभा शुक्रवारी, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही सभा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होईल. सभेचे पिठासन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील असतील. दरम्यान, सभापती पदासाठी संचालक लक्ष्मणराव पाटील (लकी टेलर) आणि सुनील महाजन अशा दोन नावांची चर्चा आहे.
जळगाव बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांच्याविरुध्द १४ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अशा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यापूर्वीच श्री.सोनवणे यांनी आठवड्यापूर्वी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाची सभा रद्द केली होती. सभापती पदाचा सोनवणेंनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची शुक्रवारी निवड होत आहे. यानिवडीकडे जाणकारांचे लक्ष लागून राहणार आहे.