ईद-ए-मिलाद २९ सप्टेंबरला साजरी होणार

0
35

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी

हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आपले सण एकोप्याने साजरे करता यावे, यासाठी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन तर २९ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय शिंदखेडा पोलीस स्टेशनला झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, नगरपंचायत प्रशासक प्रशांत बिडगर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, महावितरण कंपनीचे अभियंता तीनखेडे उपस्थित होते.

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे हिंदू-मुस्लिम बांधवांचे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीत २९ रोजी मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद साजरा करणार आहे. २८ रोजी अनंत चतुर्दशी दिवशी हिंदू बांधव श्री गणरायाचे विसर्जन करणार असल्याचे एकमत झाले. मोहम्मद पैगंबर जयंती २९ सप्टेंबरला साजरी करण्यात येईल, असे तेरा घर मोहल्ला मुस्लिम पंच कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याचे मुस्लिम बांधवांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे म्हणाले की, १४ सप्टेंबरपासून विविध सणांना सुरुवात होत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत तसेच जातीय सलोखा टिकावा, यासाठी होणारे सण उत्सव शांततेच्या मार्गाने सुरळीत पार पाडण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवांनी त्या पार्श्वभूमीवर सण उत्सव एकोप्याने साजरे करावे, असे आवाहन केले. तसेच सण-उत्सव काळात कायद्याचे पालन करावे. जे कोणी कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सण उत्सवात धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वैफल्य व्हिडिओ, संदेश पोहोचणार नाहीत याची काळजी युवकांनी घ्यावी, अश्या सूचनाही त्यांनी केल्या. पारंपरिक वाद्याने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी केले.

यांनी व्यक्त केले मनोगत

साऊंड सिस्टीमच्या आवाज मर्यादेसह मिरवणूक काढावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले. यावेळी माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण माळी, पत्रकार चंद्रकांत डागा, डॉ.इद्रिस कुरेशी, माजी नगरसेवक सुनील चौधरी, दीपक अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, तेरा घर मोहल्ला मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार संजय खैरनार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here