साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील बी.पी. आर्ट्स, एस.एम.एस. सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आदर्श गाव पाटोदा, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजी नगर येथे काढण्यात आली होती. राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करीत असताना प्रत्यक्ष जाऊन ग्रामपंचायतीच्या कार्याचा कामाचा अनुभव घेता यावा, यासाठी महाराष्ट्रातील आदर्श गाव पाटोदा येथे सहल काढण्यात आली. सहलीत विविध ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी पाहणी करुन सहलीचा आनंद लुटला.
आदर्श गावाची संकल्पना ज्यांनी प्रत्यक्ष कृतीतून उतरवून त्या गावाला देशाच्या नकाशावर नेले त्या भास्करराव पेरे पाटील यांचे खऱ्या अर्थाने आदर्श गावासारखे आदर्श विचार अनुभवीयुक्त ज्ञान विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले. यावेळी भास्करराव पेरे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी राष्ट्रीय व राज्याच्या राजकीय परिस्थितीवर संवाद साधला. त्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गावाची पाहणी केली. स्मशानभूमी, सांडपाण्याची यंत्रणा, पिठाची गिरणी यासह विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना अतिशय नाविन्यपूर्ण बाबी अनुभवता आल्या. त्यानंतर पुढील प्रवासासाठी गावाचा निरोप घेतला. त्यानंतर श्री दत्त देवस्थान देवगड, ता.नेवासा येथील श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. तेथील परिसर अतिशय स्वच्छ मनमोहक सुविधांनी युक्त दिसून आला. मंदिर परिसरात अतिशय शांतता जाणवली. परतीच्या प्रवासात येताना वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात महादेवांचे दर्शन घेतले.
सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे, धनंजय वसईकर यांचे मार्गदर्शन लाभले. सहलीत विभाग प्रमुख प्रा.एम.ओ.अहिरे, प्रा.नितीन नन्नवरे प्रा.जी.पी. सदावर्ते, प्रा.आर.आर.बोरसे, प्रा.डॉ. सुनिता कावळे, प्रा.रवींद्र पाटील, पदवी व पदवीधर वर्गाचे राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.