साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील भरारी फाउंडेशन व वेगा केमिकल्स प्रा.लि. जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १३० पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वार्षिक फी वाटप करण्यात आली. तसेज २६ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी द गार्डियन्स फाउंडेशनतर्फे दत्तक घेण्यात आले. भरारी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकरी संवेदना’ या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे ९ वे वर्ष असून आतापर्यंत संस्थेने ४५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील धानवड येथील पाच गरजू शेतकऱ्यांना रतनलाल बाफना अनुसंधान केंद्रातर्फे 10 बैल शेतीच्या कामासाठी मोफत देण्यात आले.
तसेज २० शेतकऱ्यांना मोफत बियाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप आले.पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सामाजिक बांधिलकी जपून शेतकरी आत्महत्या यासारख्या संवेदनशील बाबीवर काम करत असलेल्या भरारी फाउंडेशनच्या पाठीशी ते स्वतः तसेच प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजना व मदत जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे यांनी प्रास्ताविकात भविष्यात संस्थेतर्फे शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करून रोजगारभिमुख शिक्षण देण्याचा तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या निराधार कुटुंबियांना स्वयंरोजगार साहित्य उपलब्ध करून देण्याचा व कुटुंबातील उपवर मुलींच्या विवाहासाठी चा खर्च करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
या उपक्रमाला वेगा केमिकलचे संचालक भालचंद्र पाटील सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्यक्रम प्रसंगी सांगितले. उपक्रमासाठी भालचंद्र पाटील जैन उद्योग समूह, उद्योगपती रजनीकांत कोठारी ,राजेश चौधरी नंदलाल गादीया,बाळासाहेब सुर्यवंशी ,सुरेश पाटील , जळगांव पीपल्स बँकचे अध्यक्ष अनिकेत पाटील ,सपन झुनझुनवाला, आनंद गांधी, शैला चौधरी, विक्रम मुणोत, निलेश कुलकर्णी यांनी सहकार्य केले . याप्रसंगी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, विनोद ढगे,रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, हेमंत पाटील, दिपक जोशी, सचिन महाजन, सागर पगारीया, भगवान तिवारी, स्वप्नील वाघ आदींची उपस्थिती होती. भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षय सोनवणे यांनी आभार मानले.